अमरावती (वृत्तसंस्था) एका अल्पवयीन मुलीच्या लग्नानंतर तिला गर्भधारणा झाली. सहा महिन्यांची गर्भवती असताना छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, हृदयाशी संबंधित आजाराने पोटातील अर्भक गुदमरून अल्पवयीन मुलीचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ११ जुलै रोजी घडली. या प्रकरणी मृतक पीडितेच्या पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिन्यांची गर्भवती असताना तिच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान हृदयाशी संबंधित आजाराने तिच्या गर्भातील बाळ गुदमरले. त्यामुळे बाळ पोटातच दगावले. त्यानंतर आयरन डेफिसिएंशी अॅनिमियाने पीडित मुलीचाही मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालय गाठून मृतक मुलीच्या आईसह कुटुंबीयांचे जबाब नोंदविले. त्यानंतर या प्रकरणी मृतक मुलगी ही अल्पवयीन असल्याने पतीसह सात जणांविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक पीडित मुलगी ही हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.