मुंबई (वृत्तसंस्था) ठाणे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना कळव्यात घडली आहे. कळवा येथे कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीला जीवंत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमी महिलेवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुसरे लग्न केले असून यावरून पीडितेसोबत वारंवार भांडणे होत होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ३० ऑक्टोबरच्या संध्याकाळी आरोपींनी सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेला जिवंत जाळले. शेजाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेत पीडित महिला गंभीर भाजली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी दोघांत पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं आहे.
आरोपी पतीने रॉकेल टाकून पेटवल्याने पीडित महिला गंभीररित्या भाजली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे, पीडित महिलेचं संपूर्ण शरीर भाजल्यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. १ नोव्हेंबर रोजी कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.