नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या माजी पोलीस निरीक्षकाला मेघालयातील (Meghalaya) दक्षिण-पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पोलिस निरीक्षकानं (Police Inspector) 9 वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराचा गुन्हा केला होता.
विशेष सरकारी वकील इव्लारिशा रिंजाह यांनी गेल्या आठवड्यात दोषी नुरुल इस्लामविरुध्द जन्मठेपेची मागणी केली होती. यानंतर न्यायाधीश एफएस संगमा यांनी सोमवारी शिक्षा जाहीर केलीय. अमपाती पोलिस ठाण्यात निरीक्षकानं बंदुकीचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. आरोपीला 24 मार्च रोजी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. दोन्ही मुलींच्या वडिलांनी तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवताना सांगितलं की, आरोपीनं त्यांना जीवे मारण्याची आणि गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यानंतर निरीक्षकाला पदावरून बडतर्फही करण्यात आलं होतं. याचवेळी शिलाँगमधील न्यायालयात आत्मसमर्पण करण्यापूर्वी इस्लाम पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता.
14 वर्षांच्या मुलीवर दोनदा बलात्कार
न्यायालयानं 24 मार्च रोजी सांगितलं की, नुरुल इस्लामला POCSO च्या IPC कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. एका मुलीवर त्यानं 13 मार्च रोजी अमपाती पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार झाला होता. तर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 14 मार्चलाही आरोपीनं दुसऱ्या एका तरुणीला आपल्या वासनेचा बळी बनवलं होतं. त्याच वर्षी 31 मार्च रोजी आरोपीनं आणखी एका 17 वर्षीय मुलीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला होता.