अमळनेर (प्रतिनिधी) तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण तिच्या सख्ख्या मावशीचा मुलगा निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मारवड पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून धुळे जिल्ह्यातील चिंचवार येथील तरुणावर बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार अटक केली आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावातील मजूर महिलेची मुलगी तिच्यासोबत रात्री झोपली होती. ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजेपूर्वी ती अचानक गायब झाल्याने मारवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आणि मुलगी धुळे येथे एमआयडीसीमध्ये वास्तव्यास असल्याचे कळाले.
मुलीला पळवून नेणारा धुळेतील तरूण हा मुलीचा मावसभाऊच असल्याचेही धक्कादायक माहिती समोर आली. पिडीत मुलीला त्याने ३ मार्च रोजी मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे सांगितले. महिला कॉन्स्टेबल आणि मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.