नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमध्ये शिवशाही बस आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
नागपूर अमरावती महामार्गावर सकाळच्या सुमारास कोंढाळी जवळील साईबाबा मंदिर इथे शिवशाहीला आग लागली. या आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काहीं प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिसल्यानंतर त्याने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. चालक अब्दुल जहीर शेख यांनी सूचना देताच सर्व प्रवासी वेळेवर सामान घेऊन बसमधून बाहेर पडले. वाहक उज्ज्वला देशपांडे यांनी यावेळी सर्व प्रवाशांना सहकार्य केलं. यानंतर बसमधून आणखीनच धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केलं. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह कोंढाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.