कोल्हापूर (वृत्तसंस्था) कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरातील गटारीत सात महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
बुधवारी (दि. २३) सकाळी तेथून जाणाऱ्या लोकांना मृतदेह दिसला. त्यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचत त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. मुलगी झाल्यामुळे कोणीतरी गटारीत फेकून दिल्याची परिसरात चर्चा सुरू असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. सात महिने वाढ झालेल्या या बालिकेच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या जखमा नसून अंगावर कपडेही नव्हते.
मुलगी नको असल्यामुळे तिला गटारीत फेकल्याची चर्चा परिसरात सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी परिसरात नागरिकांकडे चौकशी केली. मात्र, याबाबत कोणालाही काहीच माहिती नसल्याचे लोक सांगतात. बाहेरगावारून कोणीतरी येथे या बालिकेला फेकले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालिकेचा मातेने त्याग केला असावा, अशी चर्चा आहे.