जळगाव (प्रतिनिधी) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या एका बँकेत नोकरी करीत असलेल्या तरुणीकडे तक्रार घेवून आलेल्या इसमाने तरुणीचा व्हीडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या इसमाला ‘पब्लिक मार’ देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शौकत अली अब्दुल गफार शख (वय- ४२, रा. कासमवाडी, ह. मु. जिल्हापेठ), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका भागात तरुणी वास्तव्यास असून ती गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका बँकेत नोकरीला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास तरुणी बँकेत काम करीत असतांना शौकतअली अब्दुल गफ्फार शेख हा त्याठिकाणी आला. त्याने बँक खात्यातून वर्ग केलेले पैसे समोरच्या पार्टीला मिळाले नसल्याची तक्रार बँकेत उपस्थित असलेल्या तरुणीकडे केली. तरुणीने त्या इसमाची तक्रार त्यांचा सेल्स ऑफिसर असलेला सहकारी वसीम बागवान याच्याकडे वर्ग केली. शौकतअली हा इसम वसीम बागवान याच्याशी बोलत असतांनाच त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरु करीत तरुणीचा व्हीडीओ तयार केला. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यानुसार तरुणीचा भाऊ आणि त्याचे मित्र बँकेत आले.
तरुणीने शौकतअली हा विनाकारण त्रास देत असल्याचे सांगितल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याची जोरदार धुलाई केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी गजानन बडगुजर हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून शौकत अली याची सुटका करीत त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन शौकतअली अब्दुल गफ्फार शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयिताचा व्हिडीओ तयार करण्याचा उद्देश काय होता ? व्हिडीओ पाठवला ती महिला कोण? याबाबतची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
















