भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून सामुहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटाघाट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
तिन्ही बहिणींनी घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आठ भावंडांचे संपूर्ण कुटुंब, त्यापैकी दोन बहिणींचे लग्न झाले होते. सोनू ही तीन मृत बहिणींमध्ये मोठी होती. मंगळवारी तिन्ही बहिणी मोटारसायकलवरून बाजारात गेल्या होत्या आणि त्यांनी बाजारातून नवीन दोरीही आणली होती. परंतू त्यांना कोणीही काहीही म्हटलं नाही किंवा कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट नाही. तरीही या तीन बहिणींनी एवढे मोठे पाऊल उचलणे हे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली आहे. मंगळवारी रात्री जेवण करून सर्व बहिणी झोपायला गेल्या. मात्र, रात्री तिन्ही बहिणी अंथरुणावर न दिसल्याने आईने त्यांचा शोध घेतला. तेव्हा घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला तिन्ही बहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. दरम्यान, तिघां बहिणींनी एकत्र आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल का उचललं?, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती समोर आलेले नाहीय.