अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह सावखेडा येथील दोन तरुणांचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय राजू भील (वय २१, रा. अमळनेर), नाना मंगलसिंग बारेला (वय २१, रा. सावखेडा) असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे.
लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या वादातून भोसकले !
पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (वय-२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.
सावखेडा गावात एकावर कुऱ्हाडीने वार
दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडली आहे. यात नाना मंगलसिंग बारेला (वय-२१) या तरूणाला वैयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (वय-२२) याने कुऱ्हाडीने वार करून नाना बारेला याचा खून केला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले.
खुनाच्या निषेधार्थ भिल्ल समाजाचा रास्ता रोको !
अमळनेरमधील दाजीबा नगरमधील अक्षय राजू भिल (२२) याच्या खुनाच्या निषेधार्थ तालुक्यातील भिल्ल समाज एकत्र आला होता. आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांना फाशी द्या अशी मागणी करीत मंगळवारी दुपारी अमळनेरात तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्याना अडवत किरकोळ दगडफेक केली. तसेच चार ठिकाणी टायरही जाळण्यात आल्याचे कळते. विविध संघटना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावरही आंदोलनकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस पोलिसांनी आरोपी अटक केल्याचे दाखवल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. अक्षयच्या खूनप्रकरणी रोहित चरण सरोदे उर्फ सोत्रे (१९), राहुल नाना सोत्रे (२३), अर्जुन नाना सोत्रे (२५) आणि नीता चेतन सोत्रे (४५) यांना चितोड ता. धुळे येथून तर आरती ज्ञानेश्वर सोत्रे (४८) हिला अमळनेरातून अटक करण्यात आली.