औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादजवळील (Aurangabad) वाळूज परिसरातल्या रांजणगाव शेणपुंजी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मैत्रिणीवर अत्याचार करून काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेकदा अत्याचार केला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूजमधल्या रांजणगाव येथील २२ वर्षीय पीडिता एम. कॉम. प्रथम वर्षात शिक्षण घेते. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासह अहमदनगर येथे गेली असताना तेथे घराशेजारी राहणारा अक्षय याच्याशी तिची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 25 जुलै 2021 रोजी अक्षयने पीडित तरुणीला फोन करून मित्राला नोट्स पाहिजे, ते घेण्यासाठी औरंगाबादला येत असल्याचे सांगितले. अक्षय हा त्याच्या मित्रासह औरंगाबादच्या वाळूज परिसरात आला. येथे दोघांची भेट झाली. त्यानंतर तुला घरी सोडतो असे सांगत अक्षयने तिला कारमध्ये बसवले.
सोबत त्याचा मित्रही होता. त्यांनी कार घराऐवजी मुंबई-नागपूर महामार्गावरील तिसगाव फाट्याकडे वळविली. त्यावर तरुणीने आक्षेप घेतला. त्यावेळी कार थांबवून मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत, तिच्यावर तेथेच जबरदस्तीने अत्याचार केला. अक्षय तिच्यावर अत्याचार करीत असतान सोबत असलेल्या मित्राने या घटनेचे मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले, तर व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिला घरी सोडले. बदनामीच्या भीतीने तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही, मात्र व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारवार विविध ठिकाणी नेऊन अक्षयने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याने अखेर तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत सांगितली.