चाळीसगाव (प्रतिनिधी) एकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरावर गोळीबार करून पोलिसांना दिली खोटी माहिती देत कट रचल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याच्या शोधार्थ पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, रघुनाथ वामन गोसावी (रा. डोणदिगर, ता. चाळीसगाव) यांनी कैलास रघूनाथ पाटील याच्याविरुध्द त्यांच्या मुलीचे अपहरण केलेबाबत कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याचा बदला घेण्यासाठी रघुनाथ गोसावी यांना फसविण्यासाठी कट कारस्थान रचून कैलास पाटील आणि गणेश पाटील यांनी उमरटी, मध्यप्रदेश येथून एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन गोळ्या २० हजाराला विकत घेतले. त्यानंतर कैलासने त्याचा त्याचा मेहुणा गणेश पाटील याच्याकडून स्वतः राहत असलेल्या डोणदिगर (ता. चाळीसगाव) शिवारातील शिंपी यांच्या मळ्यातील घरावर दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दरम्यान गावठी कट्ट्याने दोन गोळ्या फायर करवून घेतल्या. तसेच सदरचा फायर रघुनाथ गोसावी याने केला, अशी खोटी माहिती डायल ११२ वर पोलीसांना दिली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत.