मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. तत्पूर्वी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एकत्र भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षचा पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, हा कळीचा प्रश्न होता. शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्ष पद जाईल आणि त्या बदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असं सूत्रांचे म्हणणे आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. काँग्रेसकडील खात्यात फेरबदल झाल्यानंतर राज्य सरकारमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांची सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे. मात्र, नितीन राऊत उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात येईल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नव्हतं, त्यात बाळासाहेब थोरात यांच्यावर हायकमांडने विश्वास दाखवत त्यांच्यावरही ही जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यानंतर राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळालं, सत्तेत येण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली होती, आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे, पण पटोले फक्त प्रदेशाध्यक्षपद सांभाळणार की त्यांना मंत्रिपदही मिळणार हे आगामी काळात कळेल, परंतु तुर्तास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खातं नाना पटोलेंना मिळेल आणि राऊत यांना अध्यक्षपद दिलं जाईल असंही सांगण्यात येत आहे. परंतु नितीन राऊत मंत्रिपद सोडतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.