सिल्लोड (वृत्तसंस्था) पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शहर परिसरातील खोडकाई वाडी परिसरात रविवारी ( (दि. १) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. फैज खान नदीम खान पठाण (रा. नूरानी मोहल्ला, सिल्लोड ) असे मृत बालकाचे नाव आहे.
रविवारी सुटी असल्याने तौफिक शब्बीर (१३), रिजवान वसीम पठाण (१३), बाबा शेख (१४) फैज खान नदीम खान पठाण (१४) हे सर्व मित्र खोडकाईवाडी येथील पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. चौघांपैकी कोणालाच पोहता येत नसल्याने ते नेहमी उथळ पाण्यात आंघोळ करायचे. अंघोळ करत असताना फैज हा खोल पाण्यात गेला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड केली.
यावेळी शेजारी असलेले अनीस फकिरा पटेल, हकीम शब्बीर पटेल यांनी नदीत उडी मारली मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत फैजल खान याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.