अमरावती (वृत्तसंस्था) दर्यापूर-अकोट मार्गावरील सांगळूद दरम्यान साबळे जिनिंगजवळ दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. सौरभ उर्फ तन्मय उज्वल वानखडे (१९, रा. साईनगर, दर्यापूर) व विकास प्रकाश चहाकर (३५, रा. कंझरा, ता. मूर्तिजापूर) असे अपघातातील मृतकांची नावे आहेत. जखमींमध्ये विशाल अरुण रायबोले (१९, रा. सांगळूद) व हिमांशू गजानन खंडारे (१८, रा. चांदूर जहानपूर) यांचा समावेश आहे. दरम्यान, यातील मयत विकास चहाकर हे बहिणीची भेट घेऊन घरी जात असतांना हा अपघात झाला.
सौरभ ऊर्फ तन्मय उज्ज्वल वानखडे (१९, रा. साईनगर, दर्यापूर) व विकास प्रकाश चहाकर (३५, रा. कंझरा, ता. मूर्तिजापूर असे अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये विशाल अरुण रायबोले (१९, रा. सांगळूद), हिमांशू गजानन खंडारे (१८, रा. चांदूर जहानपूर) यांचा समावेश आहे. दर्यापूर येथून सौरभ वानखडे, विशाल रायबोले, हिमांशू खंडारे हे तीन मित्र आपल्या दुचाकीने सांगळूदला जात होते. त्याचवेळी येवदा येथून प्रकाश चहाकर हे दर्यापूर मार्गे आपली दुचाकीने मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे जात होते.
दर्यापूर-अकोट रस्त्यावर शहरापासून तीन किमी अंतरावरील साबळे जिनिंगलगत दोन दुचाकींची • समोरासमोर जबर धडक झाली. या दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व रुग्णसेवकांच्या साहाय्याने मृतदेह शवविच्छेदनाकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता.
बहिणीची भेट ठरली अखेरची !
मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील विकास चहाकर हे गुरुवारी दुपारी येवदा येथील बहीण रोशना प्रदीप रामेकर यांच्याकडे आले होते. दरम्यान बहिणीची भेट घेऊन घरी परत जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. घटनेबाबत समजताच उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या बहिणीने मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. बहीण-भावाची ही भेट अखेरची ठरली. उपजिल्हा रुग्णालयात गर्दी अन् आक्रोश अपघातानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. या वेळी दोन्ही मृतकांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती, तर दोघांच्याही कुटुंबातील महिलांचा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.