भडगाव (प्रतिनिधी) येथील महावितरण कार्यालयात असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कॅबीनची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज सात पैकी सहा संशयित आरोपींना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यातील एक आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या कृषी पंपाच्या वीजबिलाची सक्तीने वसुली या विरोधात भडगाव व पाचोरा तालुक्यातील महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने भडगाव येथील चाळीसगाव रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयात सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोलिस बंदोबस्तात शिवसेनेतर्फे आंदोलन केले. मात्र हे आंदोलन झाल्यानंतर चाळीसगाव रस्त्यावरील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे (वय ४३) यांच्या दालनात मोटारसायकलवर आलेल्या सात जणांनी प्रवेश करत त्यांना मारहाण करण्यात आली होती. तर कॅबीनची तोडफोडीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये नुकसान केले होते. यावेळी उपस्थित असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे हे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना सोडविण्याच्या प्रयत्न करण्यासाठी गेले असता यावेळी त्यांनाही सात अज्ञांत हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. यात गजानन राणे खाली पडुन मयत झाले होते.
अजय धामोरे यांना मारहाण व वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे यांच्या मृत्युस कारणीभुत असलेले सर्व संशयीत आरोपी फरार होते. या प्रकरणी भडगाव पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस यांनी तब्बल पाच दिवस शोध घेत आज दुपारी सात पैकी सहा आरोपींना अटक केली आहे. यात जितेद्र विश्वासराव पेढारकर, अनिल बारकू पाटील, संदीप रामदास पाटील, सुमित रविद्र सांवत, गणेश सुदाम चौधरी सर्व राहणार पाचोरा, चरणसिंग प्रेमसिंग पाटील रा. वडगाव सतीचे ता. भडगाव यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्यापही फरार असुन त्याच्या शोध सुरु आहे. सर्व आरोपीना भडगाव न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपीना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.