पुणे (वृत्तसंस्था) व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने. याच उलटीच्या तस्करीचा प्रकार पुणे वनविभागाने उघडकीस आणला आहे. पुणे वनविभागाने पूर्णानगरमध्ये ३ किलो व्हेल माशाची उलटी जप्त केले आहे. या उलटीची अंदाजे किंमत तब्बल २ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्बरग्रीस ही एक असा पदार्थ आहे जो स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. एम्बरग्रीस हे समुद्रात तरंगताना अनेकदा आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत एम्बरग्रीसची तस्करी करण्याचे अनेक प्रकार भारतात आढळून आले आहेत. असंच प्रकरण पुणे वनविभागाने पूर्णानगर पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आणलं आहे.
पूर्णानगरमध्ये व्हेलची उलटी विक्री करण्यासाठी अज्ञात इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व वनकर्मचारी यांची बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आले आहे. त्यावेळी, आरोपी मुहमदनईन मुटमतीअली चौधरी, योगेश्वर साखरे, अनिल कामठे, कृष्णात खोत, ज्योतिबा जाधव, सुजाता जाधव अशी आरोपींची नाव आहे. यासर्व आरोपींना व्हेल माशाची उलटी विक्री करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. या उलटीचा उपयोग हा अत्तर तयार करण्यासाठी करण्यात येणार होता.
पुणे वनविभागाने पूर्णानगरमध्ये ३ किलो व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केले आहे. त्याचबरोबर एक मारुती स्विफ्ट कंपनीची कार जप्त करण्यात आली असून ६ आरोपींना अटक केली आहे.