सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यात बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे.
एसटी स्टँड हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. या स्टँड परिसरात सहा शिवशाही बस गेल्या काही दिवसांपासून उभ्याच होत्या. या बसेसला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे धुर लांबपर्यंत दिसत होते. ते पाहून अनेक लोक एसटी स्टँड परिसरात दाखल झाले. संपूर्ण शहरात आगीची बातमी पसरली. अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. याशिवाय त्याठिकाणी प्रवाशांचीदेखील गर्दी होती. प्रशासनाने सुरुवातीला प्रवाशी आणि इतर पाहणाऱ्यांना हटकवून तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.
एका बसला आग लागल्यानंतर ही आग पसरली. आणि बाजूला उभ्या असलेल्या बसनंही पेट घेतला. दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने आग का लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या चौकशीअंतीच नेमंक कारण समजू शकेल.