धरणगाव (प्रतिनिधी) शहरात बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे युवासेनेचे विस्तारक शरद काेळी यांनी जाहीर सभेत आक्षेपार्ह भाषण केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी जळगावात पाेलिसांनी गुरुवारी घेराबंदी करण्यात आली हाेती. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे शरद कोळी जळगावातून गायब झाल्याचे बोलले जात आहे. परंतू पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद कोळी यांना पळून जाण्यास माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी मदत केलीय. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’सोबत बोलतांना दिलीय. तर दुसरीकडे निलेश चौधरी यांनी आपण कोणतेही चुकीचे काम केलेले नाहीय. त्यामुळे आपण कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.
नेमकं काय घडलं
शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांची महाप्रबाेधन यात्रा सध्या सुरू आहे. बुधवारी धरणगावात त्यांची जाहीर सभा झाली. त्यात युवासेनेचे विस्तारक शरद काेळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विराेधात वैयक्तिक टीकेसह त्यांच्या जातीबद्दलही आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा आरोप आहे. या विराेधात गुर्जर समाजातर्फे पाेलिस अधीक्षकांना सामाजिक भावना दुखावल्याने दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच काेळी यांच्यावर तसेच आयाेजकांविरुद्ध कठाेर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली हाेती. त्यानंतर काेळी यांना भाषणबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर कोळी यांना जिल्ह्यातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर धरणगाव पोलिसात जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करून दाेन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल शरद काेळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय म्हटले पालकमंत्री
दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिलीय की, समाजावरील टीका सहन करणार नाही. शरद कोळी हे जर मर्दूमकी दाखवतात तर पळून का गेले?. त्यांना पळून जाण्यास माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी मदत केली आहे.त्यामुळे चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
निलेश चौधरी यांनी दिले प्रतिउत्तर
तर आपण कोणतेही चुकीचे काम केलेले नाहीय. त्यामुळे आपण कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. आधी शरद कोळी, गुलाबराव वाघ, जानकीराम पाटील आता माझ्या निमित्ताने पुन्हा एकदा बहुजन समाजाला टार्गेट केले जात आहे. परंतू आपण कोणतेही चुकीचे काम केलेले नाहीय. त्यामुळे आपण कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. जेलमध्ये देखील जायला तयार असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे.