नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा मागील काही काळापासून चर्चेत आहे. मात्र आता केंद्र सरकारने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधानांचा फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी या संबंधी एक प्रश्न विचारला होता. कोरोनाच्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे, तशी त्याची गरज आहे का किंवा ते बंधनकारक करण्यात आलं आहे का आणि यामागे काय कारण आहे असा प्रश्न खासदार कुमार केतकरांनी राज्यसभेत विचारला होता.
कुमार केतकरांच्या या लिखित स्वरुपाच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, “कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो हा व्यापक जनहितासाठीच लावण्यात आला आहे. लस घेतल्यानंतरही लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांबद्दल जागरुकता निर्माण करण्याासाठी हा फोटो लावण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांबद्दल लोकांमध्ये परिणामकारक जागरुकता निर्माण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.”
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या की, “आपल्या देशातील कोरोना लसीचे सर्टिफिकेट तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मानदंडांचे पालन करण्यात आलं आहे.”