मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उत्तर सभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील एक ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमध्ये शिवसेनेवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे, त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत लंका दहन होणार, मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या फडणवीसांच्या या भाषणावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली आहे. थेट विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधताना ते वैफल्यग्रस्त असल्याचा टोला राऊत यांनी लगावलाय. “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे,” असं सूचक ट्विट राऊत यांनी केलं.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. तो फेटाळून लावताना फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केल़े शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईची किती वाट लागली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजना व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात ठप्प झाले आहेत. परिणामी मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळय़ा-लाठय़ांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला. मी जमिनीशी-सामान्य लोकांशी जोडलेला कार्यकर्ता आहे म्हणून या स्थानापर्यंत आलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलो नाही. माझ्या पाठीत खंजीर खूपसून माझे राजकीय महत्त्व कमी कराल, हे विसरून जा. तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.