नवीन नाशिक (प्रतिनिधी) येथील अंबडमधील महालक्ष्मीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली, ज्यात बुलेटवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकला. संशयितांनी ‘शांत बस, नाहीतर इथेच गोळ्या घालेन’ असे धमकावत सुमारे तीस तोळे वजनाचे दागिने घेऊन पलायन केले. पिस्तुलाचा धाक व दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली लॉन्स ते प्रणय स्टम्पिंग रस्त्यावर महालक्ष्मीनगर (अंबड) येथील मुख्य रस्त्यालगत श्री ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवार दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास माऊली लॉन्सकडून बुलेटवर तोंडाला रुमाल बांधून तीन जण दुकानाजवळ आले. यातील एक जण बुलेट घेऊन पुढे गेला. यानंतर उरलेल्या दोन दरोडेखोरांनी आजूबाजूला रेकी करून दुकानात प्रवेश केला.
दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दुकानात बसलेले दुकानाचे मालक घोडके यांच्यावर एकाने पिस्तूल रोखले, तर दुसऱ्याने त्यांच्या पत्नीला बाजूला केले. आरडाओरड करू नका, अन्यथा नाही तर इथेच गोळ्या घालू’, अशी धमकी देत संशयितांनी काउंटरमध्ये ठेवलेले तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवीत भरून पलायन केले. यानंतर दरोडेखोरांनी घोडके पती-पत्नीच्या तोंडावर कुठल्या तरी औषधाचा स्प्रे फवारून दुकानातून पळ काढला. काही काळानंतर घोडके यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. दरोडा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनास्थळी श्वान पथक देखील आले होते. घटनास्थळावरून संशयित दरोडेखोरांचे ठसे घेण्यात आले.
अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुकानमालक घोडके यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत अधिक तपास करीत आहेत.