नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला. काँग्रेस भारताकडे संवाद म्हणून पाहते तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींची तुलना कोरिया मॉडेलशी केली.
संभाषणादरम्यान राहुल गांधी यांनी दावा केला की, भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मोदींच्या आर्थिक धोरणांची कोरियाशी तुलना करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी कोरिया मॉडेलनुसार विचार करतात, त्यांना वाटते की, मोठ्या लोकसंख्येला एखादी अल्प रक्कम देऊन ते काही लोकांच्या नियंत्रणाखाली सत्ता आणि संपत्ती आणू शकतात.
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, भारतातील लोकशाहीची मूलभूत संरचना एका संस्थेने काबीज केली आहे. राहुल म्हणाले की, संविधानानुसार भारत हे एक राष्ट्र नसून विविध राज्यांचे संघटन आहे आणि राज्यांमध्ये संवाद आवश्यक आहे. काँग्रेस भारताकडे संवाद म्हणून पाहते तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आज भारताचा आवाज बनलेल्या संस्थांवर हल्ले होत आहेत. काँग्रेसमधील बदल आवश्यक असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, यासाठी पक्षाचे दरवाजे लाखो तरुणांसाठी आधी उघडावे लागतील.
याशिवाय राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस गेल्या सात वर्षांपासून सत्तेत नसली तरी आपण सत्तर वर्षांपासून सत्तेत आहोत, भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक पक्ष अशा टप्प्यातून जातो. आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल आणि आपली भूमिका नव्या पद्धतीने समजून घ्यावी लागेल. भारतातील राष्ट्रीय पक्ष हा सर्वांना एकत्र आणणारा पक्ष असेल. काँग्रेससाठी हे आव्हान नसून मोठी संधी आहे. आरएसएस-भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीत लढा आहे.