जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रतिबंधित दहशतवादी संघटना स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चा सदस्य हनीफ शेख (47) याला नुकतीच अटक भुसावळमधून दिल्ली पोलिसांनी शिताफीने केली. दरम्यान, सात राज्यात शोध घेतल्यानंतर एका गोपनीय माहितीच्या आधारे शेवटी हानिफ अटक करण्यात आली. नावात बदल केल्यामुळे हानिफला शोधायला तब्बल २२ वर्ष लागली.
नाव बदल केल्यामुळे ओळख पटवणे झाले होते कठीण !
दिल्ली पोलिसांनी सर्वात कुख्यात आणि वॉन्टेड सिमी दहशतवादी म्हणून वर्णन केलेल्या हनीफ शेख, मोहम्मद हनीफ आणि हनीफ हुदाई ही नावे देखील आहेत. तो 22 वर्षांपासून फरार होता आणि 2002 मध्ये त्याला घोषित गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. हनीफ शेख ‘इस्लामिक मुव्हमेंट’ या सिमीच्या अंतर्गत येणाऱ्या मासिकाचा संपादक होता आणि बंदी घातलेल्या संघटनेत अधिक सदस्यांना सामील करण्यात त्याचा सहभाग होता. मासिकावर फक्त ‘हनीफ हुदाई’ हे नाव होते जे छापलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते.
पोलिसांनी हनीफ शेखचा शोध कसा लावला?
हनीफ शेखने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक आणि केरळमध्ये सिमीच्या बैठकांमध्ये भाग घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, जेव्हा जेव्हा पोलिसांनी बंदी घातलेल्या संघटनेच्या कारवायांवर कारवाई केली तेव्हा हनिफ शेख त्यांच्या हातातून निसटून गेला होता. गेल्या चार वर्षांपासून दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध पुन्हा घेण्याचा प्रयत्न सुरु केला. शेखने आपले नाव बदलले असून आणि तो आता मोहम्मद हनिफ म्हणून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शेखला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या दक्षिण रेंज स्पेशल सेलने वेगवेगळ्या राज्यांतून त्याच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
तब्बल सात राज्यांत शोध !
शेख आणि त्याच्या साथीदारांचा माग काढण्यासाठी या पथकाने तब्बल सात राज्यांत आपल्या खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. एकेदिवशी हानिफ शेख याने आपली ओळख बदलली असून तो महाराष्ट्रातील भुसावळ येथील उर्दू शाळेत काम करत असल्याचे एका खबऱ्याने दिल्ली पोलिसांना सांगितले. त्यानुसार शेखला परिसरातून अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. 22 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी मोहम्मदीन नगरहून खडका रोडकडे जाणाऱ्या संशयित व्यक्तीची ओळख हनिफ शेख म्हणून केली.
पळ काढण्याचा प्रयत्न !
“22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.50 च्या सुमारास मोहम्मदीन नगर ते खडका रोडला जात असलेल्या एका व्यक्तीचे नाव हनिफ असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांच्या पथकाने हानिफला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू मोठ्या शिताफीने हानिफला ताब्यात घेण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले. तसेच हनीफ हा सर्वात कुख्यात आणि हवा असलेला SIMI दहशतवादी होता ज्याने देशभरातील प्रतिबंधित संघटनेच्या विविध कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे पोलीस उपायुक्त (स्पेशल सेल) आलोक कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
कोण आहे हनीफ शेख?
हनीफ शेख 1997 मध्ये सिमीमध्ये सामील झाला. त्यानंतर काही कडवट सदस्यांशी संपर्क वाढल्यानंतर तो अत्यंत कट्टरपंथी झाला. त्यानंतर त्याने इतर तरुणांना सिमी संघटनेत सामावून घेण्यास सुरुवात केली. २००१ मध्ये सिमीचे तत्कालीन अध्यक्ष साहिद बदर याने हनीफ शेखची ‘इस्लामिक मूव्हमेंट’च्या उर्दू आवृत्तीचे संपादक म्हणून नियुक्ती केली. हानिफ हा मासिकाचा संपादक असताना अनेक चिथावणीखोर लेख लिहिल्याचा आरोप आहे. हानिफला दिल्लीतील झाकीर नगर येथील सिमीच्या मुख्यालयात एक खोली देण्यात आली होती.
2001 मध्ये पोलिसांच्या छापेमारी दरम्यान काढला होता पळ !
27 सप्टेंबर 2001 रोजी सिमीचे पदाधिकारी त्यांच्या मुख्यालयाजवळ पत्रकार परिषद घेत असताना दिल्ली पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सिमीच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली होती परंतु हनिफ शेख आणि इतर अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले आणि भूमिगत झाले होते. त्यानंतर हानिफ महाराष्ट्रातील जळगाव आणि तेथून भुसावळला गेला. अटकेपासून वाचण्यासाठी तो आपले ठिकाण बदलत राहिला आणि भुसावळ येथील एका शाळेत उर्दू शिक्षक म्हणून काम करू लागला. दरम्यान, तरुणांना सिमीमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी अनेक ठिकाणी भेटी दिल्याचेही त्याने कबूल केले असल्याचे कळते.
तपासाठी हनीफला महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात घेऊन जाणार !
सिमीवर बंदी आल्यानंतर त्यांच्या काही वरिष्ठ सदस्यांनी ‘वहादत-ए-इस्लाम’ नावाची नवी संघटना सुरू केली. हनीफ शेख त्याच्या ‘थिंक टँक’ सदस्यांपैकी एक होता आणि दोन्ही संघटनांना वित्तपुरवठा करण्यासाठी पैसे गोळा करण्यात त्याचा कथित सहभाग होता. तसेच दिल्लीसह भुसावळमध्ये हनिफ शेखविरुद्ध चार गुन्हे आहेत. इतर दहशतवादी कारवायांमध्ये त्याची भूमिका तपासण्यासाठी पोलीस आता हनीफ शेखला महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात घेऊन जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.