मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत बोलताना शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोप केला. त्यावर नवाब मलिक यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला. ‘मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु हा फरक एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
‘सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या नावाने स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित आहे हे भाजप मांडत आहे. मोदींना आजपर्यंत कळलंच नाही पवारसाहेब या देशातील कृषी सुधार समर्थक होते तेव्हापण आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही,’ अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केला. ‘आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही, पण एकमत निर्माण करणे. लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना आपलंच मत रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार घेत असेल तर ते योग्य नाही,’ असंही नवाब मलिक म्हणाले. नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. सर्वांना मान्य असेल तरच कायदा केला पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेत्यांकडून सातत्याने राज्यात सत्तांतर होणार, असे दावे केले जातात. त्यात विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदर येथे बोलताना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचे संकेत दिले. आम्हीच फासे पलटवणार. कोणतीही शिडी न वापरता आम्ही हे करून दाखवू. हे फासे मोठे असतील, अशाप्रकारचं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ नारायण राणे यांनीही याबाबत महत्त्वाचे विधान केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे बोलले होते. अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातलं सरकार जाऊ दे आणि राज्याला नवं चांगलं सरकार मिळू दे, अशी इच्छा राणे यांनी प्रदर्शित केली होती. प्रत्यक्षात शहा यांनी आपल्या भाषणात ठाकरे सरकारचा तीन चाकांची रिक्षा असा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली पण ऑपरेशन लोटसबाबत काहीच भाष्य केलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीस व राणेंची खिल्ली उडवली.