नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा २०२१ मध्ये प्रादुर्भाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात असल्याचा इशारा यूनिसेफनं दिला आहे. २०२० प्रमाणेच पुढल्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास याचा गंभीर परिणाम एका पिढीला भोगावे लागतील असा अहवाल यूनिसेफनं दिला आहे. १४० देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भात माहिती समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या या संघटनेचं म्हणणं आहे की, कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. कारण जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी आणि असमानतेचा समावेश करण्यात आला आहे. यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही तर जवळपास २० लाख मुलांचा पुढिल १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफनं व्यक्त केलं आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान सरकारनेही खबरदारीचे घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानातील ८ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.