नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. जौनपूर आणि देवरिया येथील सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, अलाहाबाद न्यायालयाने निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे.
लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचे काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर ‘राम नाम सत्य है’ ची यात्रा आता निघणार आहे.
आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्माचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे, असे योगी आदित्यनाथ या वेळी म्हणाले.
धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. यावेळी न्यायालयाने जोडप्याची याचिकादेखील फेटाळून लावली.