मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने विरोधक सध्या महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. ‘राज्यात काही झालं तरी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जाते. मग दिल्लीत जे कृषी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू.’ अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे”. “प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं. प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती. मात्र, काहीवेळातच ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होेते, असे समजते.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही झाली. हे वादळ शांत होत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कधी नव्हे इतके संकटात सापडले आहे. परिणामी आता महाविकासआघाडीतील प्रत्येक नेत्याच्या भेटीगाठीतून कोणते ना कोणते अर्थ काढले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांची ही सहकुटुंब भेट सर्वांसाठीच अनपेक्षित ठरली. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट आहे की यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये कोणती राजकीय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, “विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.