मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा तयार करण्यासाठी योगी सरकारकडून वेगाने हालचाली केल्या जात आहे. लवकरच उत्तर प्रदेशात हा कायदा लागू होण्याची चिन्हं आहेत. तसेच मध्यप्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे. उत्तर प्रदेशातील सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लव्ह जिहाद बाबतचा उत्तर प्रदेशसारखाच कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू”, असे सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार जबरदस्ती धर्मांतरासाठी 5 वर्षांची तर सामूहिक धर्मांतर करायला लावल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच हा गुन्हा अजामिनपात्र असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय आमिष देऊन किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्म परिवर्तन करायला लावणं हा गुन्हा ठरवण्यात येणार आहे.