जळगाव (प्रतिनिधी) पत्नीसोबतचा कौटुंबिक वाद मिटवून तिला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या योगेश प्रल्हाद पाटील (रा. नांद्रा, ता. जामनेर) या तरुणाचा सासरा आणि शालकाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला. ही घटना दि. २७ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घडली होती. या प्रकरणी त्याच्या सासरा आणि शालक अशा दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात योगेश पाटील हे पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास होते. योगेश आणि त्याच्या पत्नीमधील कौटुंबिक वाद पोलीस अधीक्षक कार्यालयामागील महिला दक्षता विभागात सुरू होता. दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास योगेश पाटील हा पत्न ीसोबतचा वाद मिटवून तिला घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाला होता. याचवेळी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य गेटजवळ योगेशचे सासरे निवृत्ती तुकाराम पाटील आणि शालक चेतन निवृत्ती पाटील (दोघेही रा. सवतखेडा, ता. जामनेर) या दोघांनी योगेशला गाठले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १५ दिवसांच्या उपचारानंतर दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
चुलत भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा
या घटनेप्रकरणी योगेशचे चुलत भाऊ श्रीराम पाटील यांनी सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे निवृत्ती तुकाराम पाटील आणि चेतन निवृत्ती पाटील या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















