मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रणौत पाठोपाठ अवैध बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जुहू येथील निवासी इमारतीत विनापरवाना हॉटेल सुरू केल्याची तक्रार मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे केली केल्यानंतर सोनू सूद यानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पालिकेने दाखल केलेल्या तक्रारीविरोधात त्यानं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
अभिनेता सोनू सूदनं मुबई महापालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अवैध बांधकाम प्रकरणी पाठवलेल्या बीएमसीच्या (BMC) नोटिशीला सोनूनं बॉम्बे हायकोर्टात आव्हान दिलं आहे. आपण कोणत्याही प्रकारचं अवैध बांधकाम केलेलं नाही हे सोनूनं स्पष्ट केलं आहे. जुहू परिसरात सोनू सूदच्या मालकीची ६ मजली इमारत आहे. ही इमारत रहिवासी इमारत असूनदेखील या इमारतीमध्ये सोनू सूदने परवानगी न घेता हॉटेल सुरू केलं असा आरोप बीएमसीने केला आहे. त्यामुळे MRTP ( Maharashtra Region & Town Planning) कायद्याअंतर्गत सोनू सूद विरोधात लिखित तक्रार बीएमसीने जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सोनू सूदनं याप्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल करत आपण केलेले बदल कायदेशीरच असल्याचं म्हटलं आहे. सोनू सूदचे वकील डी. पी. सिंग यांनी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत म्हटलं की, सोनूनं सहा मजली शक्तिसाह इमारतीत कोणतंही अवैध बांधकाम केलंलं नाही. इमारतीत असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत ज्यासाठी बीएमसीच्या परवानगीची गरज आहे. एमआरटीपी कायद्याअंतर्गत मान्य असतील असेच बदल करण्यात आले आहेत. या याचिकेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीएमसीनं जारी केलेली नोटीस रद्द करण्यासंबंधित आणि दंडात्मक कारवाईही न करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे.
बीएमसीनं या प्रकरणात सोनूला गेल्या वर्षी नोटीस बजावली होती. तेव्हा त्यानं दिवानी कोर्टात याचिका केली होती. पण तिथं न्याय न मिळाल्यानं त्यानं आता हायकोर्टात धाव घेतली आहे. बीएमसीने आरोपांमध्ये म्हटलं आहे की, जुहूच्या ज्या परिसरात सोनू सूदची ६ मजली इमारत आहे तो रहिवासी भाग आहे. अभिनेता सोनू सूदने कोणत्याही परवानगीशिवाय तिथे हॉटेल सुरू केलं आहे. तसंच या इमारतीमध्ये अवैधरित्या काही स्ट्रक्चरल बदल केले आहेत. याबद्दल बीएमसीने सोनू सूदला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोटीसही पाठवली होती. पण तरी बांधकाम तसंच आहे. याप्रकरणी सोनू सूदनं पालिकेकडून जागा वापर बदलासाठी परवानगी घेतलेली आहे. आता फक्त सीआरझेडची परवानगी मिळणे बाकी आहे, असे म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात हजारो गरीब मजुरांना सोनू सूदने स्वत:च्या पैशांनी घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक लोकं त्याला देव मानतात. सोनू सूदच्या त्या कृतीलादेखील शिवसेनेकडून ‘हा राजकीय डावेपच’ असल्याचा आरोप केला झाला होता. त्यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.