जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि. 1 जून ते 16 ऑक्टोबर, 2023 पर्यंत पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोबर रोजी प्रारुप यादी प्रसिध्दी करण्यात येणार असून 5 जानेवारी, 2024 रोजी अंतिम यादी प्रसिध्द करावयाची आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. मिततल हे बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते.
या अनुषगाने भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे एसएसआर 24 चा कार्यक्रम विहित कालमर्यादित व अचूकरित्या पूर्ण करावयाचा आहे. त्याकरिता ठरवून दिलेला कार्यक्रमात प्रथम टप्प्यात दि. 1 जून, 2023 ते 20 जुलै 2023 या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरिता आवश्यक त्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया 21 जुलै ते 21 ऑगस्ट, 2023 दरम्यान करण्यात येणार आहे. तर 22 ऑगस्ट, ते 29 सप्टेंबर, 2023 दरम्यान मतदान केंद्राचे तर्कशुध्दीकरण/पुनर्रचना, मतदार यादी/ EPICS मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट, दर्जाचे छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे, सुनिश्चित करुन प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि रोल मध्ये विनीर्देशन आणि गैरमानवी प्रतिमा बदलणे, विभाग, विभागाची पुर्नरचना आणि मतदान केंद्राच्या विभाग/ भाग सिमांच्या प्रस्तावीत पुर्नरचनेचे अंतिम रुप देणे आणि मतदान केंद्राच्या यादीला मंजूरी मिळविणे, अंतर ओळखणे, आणि अशा तफावत भरुन काढण्यासाठी रननिती आणि टाइमलाईन अंतिम करणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना तयार करणे.
दिनांक 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर, 2023 दरम्यान नमुना 1 ते 8 तयार करणे, 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप यादी तयार करणे. दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे. 17 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर, 2023 दरम्यान दावे व हरकती स्वीकारणे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी विशेष मोहिमेसाठी निश्चित केलेले 2 शनिवार आणि रविवार ठरविले आहे. दिनांक 26 डिसेंबर, 2023 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. दिनांक 1 जानेवारी, 2024 पर्यंत अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डेटा बेसचे अदयावतीकरण आणि पुरविणी याद्याची छपाई करणे, दिनांक 5 जानेवारी, 2024 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येऊन आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे पारदर्शकतेबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यावेळी सांगितले.