औरंगाबाद (वृत्तसंस्था) अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात आज बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशभर कोरोना संसर्गाचे संकट असल्यामुळे सरकार यावेळी आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी विनंती केंद्र सरकारला केली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाकाळात फ्रन्टवर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर वृद्ध, आजारी नागरिक आणि सामान्यांना लस दिली जाईल. यावेळी राष्ट्रीय पातळीवरील लसीकरणाला येणारा खर्च कोटींमध्ये आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असले तरी, सामान्यांना मिळणाऱ्या लसीचा भार कोण उचलणार याचे चित्र अजूनतरी स्पष्ट नाही. केंद्र सरकारने हा खर्च उचलला नाही, तर लसीकरणाचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. याच कारणामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी अशी विनंती केली आहे.
लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचाच असतो. देशस्तरावर केंद्र सरकारने राबवायचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, यामध्ये मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी. ज्या ज्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यांचं लसीकरण करण्याची तरतून केंद्र सरकारने करावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील तसेच देशातील गरीब नागरिकांना मोफत लस मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली. “लसीकरणाचा कार्यक्रम हा देशपातळीवरच राबवायचा असतो. लस घेण्यासाठी पैसे लागत असतील तर नागरिक लस घेणार नाहीत. नागरिकांनी लस घेतली नाही तर अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे गरीब लोकांसाठी मोफत लसीकरण करायलाच हवं,” असे टोपे म्हणाले.















