जळगाव (प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असलेल्या खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. मोहाडी रोड) या बांधकाम व्यावसायीकाच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्यांनी स्प्रे मारला. त्यानंतर मारहाण करीत गळ्यातील ८ तोळ्यांची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली. ही घटना दि. ८ रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास नयनतारा रेस्ट हाऊससमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायीक असलेले खुबचंद साहित्या हे नेहमीप्रमाणे सिंधी कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांनी तेथे नाश्ता केल्यानंतर पुन्हा ईच्छादेवी चौफुली मार्गे पायी घराकडे जात होते. यावेळी नयनतारा रेस्ट हाऊससमोर दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर येवून थोड्या अंतरावर थांबले. दुचाकीवर मागे बसलेल्याने तोंडाला मफलर बांधलेला इसम खाली उतरून तो साहित्या यांच्याजवळ आला. त्याने साहित्या यांच्या डोळ्या स्प्रे मारला असता त्यांच्या डोळ्यात आग होवू लागली.
रस्त्यावर मिळून आले तुटलेली चैन, पेंडल
डोळ्यात स्प्रे मारणाऱ्या इसमांनी साहित्या यांना मारहाण केली. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ८ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने ओढून ते चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. डोळ्याची आग कमी झाल्यानंतर साहीत्या यांनी शोधाशोध केली असता, रस्त्यावर चैनचा तुकडा आणि पेंडल मिळून आले.
उपचार घेतल्यानंतर दिली तक्रार
खुबचंद साहित्या यांनी त्याच अवस्थेत घर गाठले. त्यांनी मुलाला घटना सांगितल्यानंतर ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















