मुंबई (वृत्तसंस्था) रशियाची कोरोना व्हायरसवरील लस स्पुतनिक व्ही ची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात ९९५.४० रुपयांना प्रति डोस मिळणार आहे.
देशात कोरोना विषाणूचा कहर पाहता लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही ९४८ रुपये इतकी आहे. पण, लसीच्या दरात कराची जोड दिल्यास ही किंमत काहीशी वाढत आहे. सध्या स्फुटनिक लसीच्या जवळपास दीड लाख व्हायल्स भारतात आल्या आहेत. या लसीच्या एका डोससाठी ९४८ रुपये आणि त्यावर ५ टक्के जीएसटी असं मिळून एका स्फुटनिक लसीसाठी ९९५.४० रुपये मोजावे लागणार आहेत.
स्फु़टनिक लसीचेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या लसींसाठी जवळपास २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीच्या उत्पादनाच्या दृष्टीने सध्या ६ वेगवेगळ्या कंपन्यांशी यासाठीचे करार करण्याची चर्चा आणि प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळं या लसीचं उत्पादन वाढल्यास, किंमत काही अंशी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. जगभरात वापरात असणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींपैकी स्फुटनिक ही ९२ टक्के म्हणजेच सर्वाधिक प्रभावी लस ठरत आहे.
किंमत कमी होणार
भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात सहा लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोविड व्हॅक्सिनेच २०० कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील असा दावा कलेा आहे.