भुसावळ (प्रतिनिधी) केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिकंता येत नाही. हा उमेदवार मतदारसंघातही राहत नाही. त्यांचा रहिवास जळगावात आहे. मॅच फिक्सींगमधला उमेदवार असून अनेक कार्यकत्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोमवारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका माजी आमदार चौधरींनी घेतली आहे. तर आपण संतोषभाऊंच्या भूमिकेसोबत आहोत ते जी भूमिका घेतील ती भूमिका आपल्याला मान्य असल्याचे सांगत चौधरी बंधूनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटलांचे टेंशन वाढवले आहे.
चौधरी समर्थकांमध्ये प्रचंड रोष !
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे ऐनवेळी पक्षाने तिकीट कापल्यानंतर चौधरी समर्थकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. चौधरींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनीच आता दबाव वाढवला आहे तर दुसरीकडे प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी माजी आमदार चौधरी जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आपले समर्थन असेल, असे सांगून दंड थोपटले आहेत. चौधरी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास त्यांच्या उमेदवारीचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा तर मॅच फिक्सींगमधला उमेदवार !
राष्ट्रवादी पक्षाने कार्यकर्त्यांवर उमेदवार लादला आहे. केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. पक्षाने दिलेला उमेदवार मतदारसंघातही राहत नाही. त्यांचा रहिवास जळगाव येथे आहे. मॅच फिक्सींगमधला उमेदवार आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे सोमवारी बैठक घेवून पुढील निर्णय घेवू, असे एका दैनिकासोबत बोलतांना माजी आमदार संतोष चौधरींनी सांगितले.
संतोषभाऊं जी भूमिका घेतील ती आपल्याला मान्य : अनिल चौधरी
आमच्या चौधरी परिवारातील सदस्य या निवडणूकीत उतरणार असल्याचे सांगत चौधरींचे बंधू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी यास दुजोरा दिला. आपण मोठे बंधू संतोषभाऊंच्या भूमिकेसोबत आहोत ते जी भूमिका घेतील ती भूमिका आपल्याला मान्य आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठी बच्चू भाऊ कडू यांच्याशीही बोलणे केल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलतना सांगितले.
राष्ट्रवादीत होणार बंडखोरी ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार संतोष चौधरी हे उमेदवारीसाठीचे प्रबळ दावेदार होते. यापूर्वी त्यांना पक्षश्रेष्ठींनी शब्दही दिल्यानंतर ते प्रत्यक्षात कामाला लागले होते तर भुसावळात त्यांच्या जंगी स्वागतानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रथमच चौधरींच्या रूपाने भुसावळ मतदारसंघाला उमेदवारी मिळणार होती. यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्या होत्या मात्र ऐनवेळी चौधरींची उमेदवारी कापून राष्ट्रवादी शरद पवार गटाने रावेरचे उद्योजक श्रीराम पवार यांना उमेदवारी जाहिर केली. यामुळे चौधरी समर्थक कार्यकर्त्यांच्या संतापाचा पारा वाढला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारी जाहिर करण्याची मागणी केली आहे शिवाय उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे.
15 एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन !
या संदर्भात चौधरी परिवाराने सोमवार, 15 एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार्या या बैठकीत रावेर लोकसभेबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून निर्णय घेवू, अशी माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.