धुळे (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारींचा संप सुरू असताना आज प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेत बससेवा सुरू केली. धुळे आगार बसस्थानकातून चार बस सोडल्यानंतर या बसवर अज्ञातानी हल्ला करत बस फोडल्याचा प्रकार घडला.
धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. या बसेसना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. असे असतानाही अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक चालक जखमी झाला आहे. नरडाणा येथून धुळ्याकडे येणाऱ्या बसवर नगावबारी येथे अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेत विजय भामरे हे बस चालक जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी चालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, तब्बल १४ दिवसानंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. परंतु या बस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी चार बसवर दगडफेक केली आहे. त्यामुळे संप चिघळण्याची चिन्ह दिसत आहे.