बारामती (वृत्तसंस्था) पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे केंद्र सरकार मदत करणारचं आहे. त्यामुळे नुसती टोलवाटोलवी नको, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवसांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. बारामतीपासून त्यांनी आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला. राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. यावर फडणवीस म्हणाले, राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नाही. सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्या पूर्वीही असं झालं आहे. आम्ही देखील हे पाहिलं आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं आहे, असं फडणवीस म्हणाले.