मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सातत्याने फिल्डवर असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एक-दोन दिवसांत राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असं राजेश टोपे ट्विटरवर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राजेश टोपे संयमीपणे निर्णय घेऊन आरोग्य विभागाचं नेतृत्व करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक आव्हानं होती. या सर्व आव्हानांना तोंड देत राजेश टोपे लढत राहीले. २०२० च्या एप्रिल ते जून हा कालावधी कोरोनासाठी प्रचंड भयानक होता. या काळात त्यांनी उभारलेली यंत्रणा खरंच कौतुकास्पद होती. त्यांच्या कार्यामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. ते अद्यापही राज्यातील विविध भागांमध्ये स्वत: जावून आढावा घेत होते. कोरोना संकट काळात त्यांच्या आईचंदेखील निधन झालं. मात्र, एवढं मोठं दु:ख सोसत ते राज्यात उपाययोजना करत होते. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्यांना लढवय्या आरोग्यमंत्री देखील म्हटलं जातं.