धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता – स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला जात आहे आणि भारतीय संविधानाचे मूल्ये व्यवस्था लाथाडली जात आहे, असे विधान राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एरंडोल येथे संविधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनंत राऊत यांनी केले. ते संविधान सभेच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद संयोजन समितीमार्फत सदर संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय भिक्खु संघाचे पुज्य भन्ते गुणरत्न महाथेरो, जागतिक किर्तीचे पूज्य भन्ते ज्ञानज्योती यांच्या भिक्खु संघाचे पुज्य भन्ते अमरज्योती, तसेच पुज्य भन्ते नागसेन, पुज्य भन्ते संघरक्षीत यांच्या मंगलमय उपस्थितीत संविधान सन्मान परिषद संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे सदर संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटक होते. विचार मंचावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील उपस्थित होते.
एरंडोल पारोळा तालुक्याचे आ. अमोल पाटील, संविधान प्रचारक व रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, स्वागताध्यक्ष शालिग्राम गायकवाड, मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ, बीएम फाउंडेशनचे मोहन अढांगळे, सुरेश सोनवणे, मिलिंद पवार, मुकुंद सपकाळे, हेर्मेंद्र सपकाळे, वर्षा अहिरराव, प्राईम पब्लिकेशनचे प्रदिप पाटिल, प्रितम तायडे, डॉ. सरोज डांगे, डॉ. मिलींद बागुल, उषाकिरण खैरनार, समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी के अहिरे, प्रा. अशोक पवार, धनराज मोतीराय, प्राध्यापक सत्यजित साळवे आदी उपस्थित होते.
विविध सत्रांचे मान्यवर म्हणून सेवानिवृत्त विस्ताराधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.अशोक पवार, मुख्याध्यापक संघाचे भुसावळ अध्यक्ष जेपी सपकाळे, डॉ. संजय भटकर, बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षा मंगलाताई सोनवणे, महिला समिती प्रमुख उषाकिरण खैरनार, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार इत्यादी मान्यवर म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वा.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य ‘संविधान बाईक रॅलीला’ सुरुवात झाली. सुंदर अशा संविधान रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान धारण केल्याची प्रतिमा लावण्यात आली होती. सदर प्रसंगी भैय्यासाहेब सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सदर प्रसंगी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील उपस्थित होते. रॅली प्रमुख ईश्वर बिऱ्हाडे व स्वागताध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. जळगाव जिल्हा व राज्यभरातून दोन हजारच्या जवळपास संविधान प्रेमी नागरिक सदर परिषदेला उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर बुक स्टॉल सदर प्रसंगी लागलेले होते व विक्रमी खरेदी या वेळेला ग्रंथप्रेमींमार्फत करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.अनंत राऊत पुढे म्हणाले की शासनाचे प्रतिनिधी संविधानाची शपथ घेतात परंतु मात्र आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत नाहीत. देशात आज अंधश्रद्धेला चालना दिली जात असून देशाच्या विकासाची चक्रे उलटी फिरवली जात असल्याचे ते म्हणाले. ज्या प्रकारचे प्रशासन सर्वोच्च न्यायालयात चालले पाहिजे त्या प्रकारचे प्रशासन चालत नाही, असेही ते म्हणाले. आज जे सुरू आहे ते संविधानाच्या विरोधी चाललं आहे. म्हणून आपण या प्रवृत्तींना जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य भन्ते गुणरत्न, पूज्य भन्ते अमरज्योती, पूज्य भन्ते संघरक्षित, पूज्य भन्ते नागसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्रीय ग्रंथ संविधानाचे स्मरण करण्यात आले. मंचावर दर्शनी भागात संविधानाची मांडणी करण्यात आली. बुद्धभूषण मोरे यांनी अतिशय सुंदर भीम गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर प्रसंगी अजय भामरे यांनी संविधानावर उत्कृष्ट पोवाडा सादर केला. ज्योती गजरे यांनी भीम गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अनुभूती विद्यालय जळगावच्या विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित सुंदर नृत्य सादर केले.
उद्घाटन कार्यक्रमांमध्ये संविधान शिल्पकार विशेषांक, संविधान सन्मान परिषद स्मरणिका व पुरस्कारार्थी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ तसेच वर्षा शिरसाठ लिखित ‘त्यागमूर्ती माता रमाई’ व डॉ. राहुल निकम लिखित ‘भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहीरनामा’ इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संविधान शिल्पकार विशेषांकाचे संपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी तर उर्वरित दोन स्मरणिकांचे संपादन प्राध्यापक भारत शिरसाठ यांनी केले. संविधान निर्मितीच्या काळातील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सदर प्रसंगी करण्यात आले. प्रास्ताविक संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक भरत शिरसाठ यांनी केले.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये डॉ. प्रदीप आगलावे यांनी भारतीय संविधानाला आज दुर्लक्षित करून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे मत व्यक्त केले. न्यायालयाने असवैधानिक मार्गाने एससी-एसटी मध्ये उपवर्गीकरण लादले असल्याचे ते म्हणाले. या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अनुसूचित जातीचा वर्गामध्ये प्रचंड नाराजी असून या विरुद्ध संवैधानिक लढा उभारला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. दुपारच्या परिसंवाद सत्रामध्ये जळगावचे साहित्यिक जयसिंग वाघ यांनी धर्माधिष्टीत संविधान निर्माणाचा प्रयत्न देशाच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला धोका आहे या विषयावर परखडपणे मत व्यक्त केले.
दुसऱ्या परिसंवादामध्ये नुरखॉ पठाण आणि डॉ. राहुल निकम यांनी भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाले आहे काय या विषयावर आपले विचार व्यक्त केले. भारतीय संविधानाला अपेक्षित स्त्री- पुरुष समानता आणि देशातील स्री व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न या विषयावर डॉ.सरोज डांगे, संत गाडगेबाबा विद्यापीठ नागपूर व डॉ. लीलाधर पाटील, धनदाई महाविद्यालय, अमळनेर यांनी सविस्तर मांडणी केली. किरण सोनवणे यांनी अध्यक्ष स्थानावरून भारतीय संविधानाच्या समोरील असणाऱ्या आव्हानांच्या संदर्भात सविस्तर मांडणी केली. समाज दिशाहीन झाला आहे. परंतु भारतीय संविधान मात्र या समाजाला सांभाळायला परिपूर्ण समर्थ आहे. भारताच्या मागील ७५ वर्षाच्या काळामध्ये कितीतरी चढ-उतार या देशाने पाहिलेले आहेत. परंतु अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये या देशाला सावरण्याचे काम भारतीय संविधानाने निर्विवादपणे केले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील यांनी संविधान परिषदेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार समाजावर असून मी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मंत्री झालो आहे असे उद्गार काढले. ना. पालकमंत्र्यांच्या हस्ते काकासाहेब खंबाळकर मुंबई, प्रा. शुक्राचार्य गायकवाड डोंबिवली, मोहन अडांगळे, नाशिक यांना संविधान लढा चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या निमित्ताने संविधान मूल्य जनजागृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्मृतीशेष संगीता भैयासाहेब सोनवणे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात जिल्हास्तरीय २४ व राज्यस्तरीय १७ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर प्रसंगी संविधान मूल्य जनजागृती संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून राज्यभर संविधान मूल्य प्रचार-प्रसाराचे कार्य करून संविधान साक्षरतेचे काम येणाऱ्या काळात केले जाणार आहे. संविधान मूल्य जनजागृती संघाच्या अध्यक्षपदी ॲड.रवींद्र गजरे यांची निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा आगार विभाग प्रमुखपदी शैलेश नन्नवरे यांची निवड करण्यात आली. डॉ. संजय भटकर यांची शिक्षक विभाग प्रमुख पदी तसेच रणजीत सोनवणे यांची शिक्षक विभाग कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. चैतन्य नन्नवरे व राजेंद्र वाघ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रात्री संविधान कवी संमेलनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी २७ कवींनी सहभाग नोंदवीला. तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी… दिशा मज कळाली तसा चाललो मी… या प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या कवितेने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. यात ॲड. विजयकुमार कस्तुरे, डॉ. सुरेंद्र शिंदे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, संगीता साळुंखे, डॉ.डी.व्ही. खरात, महामुने, प्रवीण महाजन, बडगुजर सर, भीमराव सोनवणे आदी कवींचा समावेश होता. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एकूण दहा ठराव संमत करण्यात आले. ठराव खालीलप्रमाणे..
१. भारत सरकारने भारतीय संविधानाला अधिकृतपणे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे.
२. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
३. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून शासनाने अधिकृतपणे घोषित करावे.
४. भारतीय संविधानाची मूल्ये रुजविणे, त्यांचे जतन आणि संवर्धन करणे, याकरिता विशेष मोहिम आणि उपक्रम राबविण्यात यावेत.
५. देशातील सर्व माध्यमाच्या शालेय व महाविद्यालयीन सर्व शाखांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधानाचा अंतर्भाव करण्यात यावा.
६. न्यायालयात संविधान साक्षीने शपथ देण्यात यावी.
७. भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी कायदेशीर तरतूद करण्यात यावी.
८. संविधान मूल्ये जनजागृती कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्यात यावे.
९. संवैधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमार्फत संविधान विरोधी कृत्य झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
१०. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी प्रास्ताविकेचे वाचन अनिवार्य करण्यात यावे.
विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. राहुल निकम, प्रा.नरेंद्र गायकवाड, भैय्यासाहेब सोनवणे, डॉ.संदीप कोतकर, राजेंद्र पारे, धनराज अहिरे यांनी यशस्वीरित्या केले. सत्र सहाय्यक म्हणून डॉ. बापूराव शिरसाठ, धनराज मोतीराय, अश्विनी गोसावी शहादा, पी डी पाटील, लक्ष्मण पाटील, मनोज नन्नवरे, वर्षा शिरसाठ, मेहमूद खाटीक, शहादा यांनी भूमिका पार पाडली. महिला समिती प्रमुख उषाकिरण खैरनार, अर्थ समिती प्रमुख प्रवीण केदार, प्रसिद्धी विभाग प्रमुख राजेंद्र वाघ, समता शिक्षक परिषद समिती प्रमुख रणजीत सोनवणे, बैठक व्यवस्था समिती प्रमुख सुनील खैरनार, भोजन विभाग प्रमुख भगवान ब्रह्मे, ग्रामीण विभाग प्रमुख सुमनताई बिऱ्हाडे, युवा समिती प्रमुख विनोद रंधे, नोंदणी विभाग प्रमुख चिंतामण जाधव, सहाय्यक शिवदास महाजन, कविराज पाटील, संविधान रथ नियोजन प्रमुख चैतन्य नन्नवरे, अर्थ वाहक समिती विविध विभाग प्रमुख प्रमिलाताई ब्रह्मे, उषाताई बाविस्कर, जे.पी. सपकाळे, बाबुराव भगत, बी.बी. शिरसाठ, उज्वला पारेराव, नलिनी संदानशिव, तसेच सर्व तालुक्यातील समन्वय समिती प्रमुख व सर्व समन्वय समिती १६० सदस्य आदींनी आपापल्या विभागाची जबाबदारी सांभाळली. हेमेंद्र सपकाळे, वर्षा अहिरराव यांनी स्मरणिका निर्मितीसाठी विशेष सहकार्य केले. तसेच भैय्यासाहेब सोनवणे यांनी पुरस्कार वितरणासाठी विशेष सहकार्य केले.
सुरेश सोनवणे, शालिग्राम गायकवाड, मिलिंद पवार, प्रा. भरत शिरसाठ यांनी भोजनदानासाठी विशेष सहयोग दिला. जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संविधान प्रेमी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य केले. एरंडोल शहर व तालुक्यातील विविध समिती सदस्यांनी भरीव योगदान दिले. वीस सामाजिक संघटनांनी या संविधान सन्मान परिषदेला अनमोल सहकार्य केले. या प्रकारच्या संविधान सन्मान परिषदा प्रत्येक वर्षी जळगाव जिल्हा भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाणार असल्याचे प्रमुख संयोजक प्रा.भरत शिरसाठ यांनी सांगितले.