मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परिक्षा २०२० पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार आहे. पूर्वनियोजित १४ मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
काही जणांची अडचण वेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाची अट येणार नाही. आपली थोडीसी गैरसोय झालीय याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. हा चार-पाच दिवसांचा काळ लागतोय तो केवळ आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी लागत असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे.
काल नेमकं काय घडलं
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.