जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण आज व उद्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगावातील विविध समस्यांबाबत राज्यपालांना निवेदन दिले. या निवेदनात राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून “वळण रस्ता” त्वरीत करण्याचे आदेश द्यावे आणि केळीला फळाचा दर्जा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की, जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद गेल्या ४ महिन्यांपासून रिक्त आहे ते तातडीने भरण्यात यावे. जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त या पदाचा कारभार नाशिक, धुळे येथील अधिकारी यांच्याकडे अतिरीक्त म्हणून आहे. त्याठिकाणी तातडीने कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा. जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत त्या तातडीने भरण्यात याव्यात. राष्ट्रीय महामार्ग जळगाव शहरातुन जातो त्यामुळे दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. त्याकरीता “वळण रस्ता” त्वरीत करण्याचे आदेश द्यावे. जळगाव शहरातील एमआयडीसीला लागून मेहरूण, रामेश्वर कॉलनी येथील कामगारांना एमआयडीसीत जाण्याकरीता जवळचा रस्ता उपलब्ध करून द्यावा. सदर मागणी खुप जुनी आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असून केळीला फळाचा दर्जा मिळावा, ही मागणी मंजूर करण्यात यावी. जिल्ह्यात कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तरी कापसाला रू. १००००/- क्विंटल भाव मिळावा. शेती माल उत्पादनाला हमी भाव योग्य प्रमाणात मिळावा. जळगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यात यावा जेणेकरून मोठे विमान उतरण्याची सोय होईल व पर्यटनाला चालना मिळेल (अजिंठा लेणी येथुन फक्त ६० कि.मी. आहे.)
कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाणे-येणेकरीता विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी, विद्यार्थ्यांचे खुप हाल होतात. विद्यापिठात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता वस्तीगृह बांधण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परीषद, जिल्हा परिषद यांच्या निवडणूका तातडीने घेण्यात याव्यात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरीकांचे कामाचा खोळंबा होत आहे. कवयित्री बहीणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी पद्धत सुनियोजित करण्याची आवश्यकता आहे. एक दिवसात शिक्षकाकडून ९० उत्तरपत्रिका तपासणी पद्धत ही न्याय देणारी पद्धत नाही. यामुळे सदोष पेपर तपासणी होते व विद्यार्थ्यांला त्याचा नाहक त्रास होतो आहे. याबाबत दिशानिर्देश द्यावेत. वरील सर्व विषय लोकहिताचे, शेतकरी हिताचे व विद्यार्थी हिताचे आहेत. याबाबत आपण संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत एवढीच माफक अपेक्षा,असल्याचे निवेदनात नमूद होते.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, चेतन पवार, सतिश सैदाणे, शहर सचिव जितेंद्र पाटील, जनहित कक्ष जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित कक्ष तालुका संघटक, संदीप मांडोळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, उपशहर सचिव खुशाल ठाकूर, श्रीकृष्ण मेंगळे, शहर संघटक जनहित कक्ष या प्रसंगी उपस्थित होते.
















