भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील अल्पसंख्याक विभागातील रहिवाशांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. गेल्या चार वर्षांपासून वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. यासोबतच, प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनात्मक मार्ग स्विकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील प्रमुख समस्या:
रहिवाशांनी आपल्या निवेदनात झोपडपट्टी सुधार क्षेत्र अंतर्गत सर्वे नंबर 15, 16, 20, 203, 20ब, 21, 44, 43, 45, 47, 48, 49, 51, 52, 56, 85, 101, 102, 104, 106, 137, 151अ येथे पाणी, वीज, रस्ते व इतर मूलभूत सेवा उपलब्ध नसल्याचा उल्लेख केला आहे. नगरपालिका प्रशासन नियमितपणे घरपट्टी व नळपट्टी वसूल करत असतानाही सुविधा उपलब्ध करून देण्यात अयशस्वी ठरले आहे.
मुख्य मागण्या:
1. शाळांची दुरवस्था: नगरपालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात.
2. मलेरिया व डेंगू नियंत्रण: शहरातील झोपडपट्टी भागात फवारणी व स्वच्छता मोहिम राबवावी.
3. दूषित पाणीपुरवठा: पिण्याचे शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.
4. अल्पसंख्यांक व दलित वस्त्यांसाठी सुविधा: खुल्या जागांमध्ये गार्डन, खेळणी व व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे.
5. स्ट्रीट लाईट व सार्वजनिक शौचालय: बंद स्ट्रीट लाईट कार्यान्वित कराव्यात व नवीन शौचालये, मुतारी बांधावीत.
6. नालेसफाई: नाले नियमित साफ करावेत व स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात.
7. वयोवृद्धांसाठी सोयी: प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी.
8. अल्पसंख्यांक निधीचा योग्य वापर: निधीचे योग्य नियोजन करून संबंधित विकासकामे हाती घ्यावीत.
9. कब्रस्तान सुविधा: मुस्लिम, बोहरी, ख्रिश्चन, पारसी समाजांसाठी कब्रस्तानांच्या सुविधा सुधाराव्यात.
बांधकाम परवानगीत भ्रष्टाचाराचा आरोप
प्रभाग क्रमांक 14 मधील सर्वे नंबर 14, 15, 16, 20, 20ब, 21 या भागातील रहिवाशांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला असता, अभियंत्यांनी लाच घेत परवानगी देण्याचा प्रकार घडला असून, काही जागरूक नागरिकांना परवानगी नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर 51 रहिवाशांच्या सह्या
या निवेदनावर इलियास इक्बाल मेमन, हबीब चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, आरिफ अब्दुल गणी, एडवोकेट ऐतेशाम मलिक, मनोज चंदन, राजू वाणी, वसीम सलीम पटेल, नजर शेख, शेख यामीन, वसीम पटेल, डॉ. मोहम्मद युनूस फलाई, डॉ. शकील अहमद, फिरोज अहमद, हरून शेख, सिकंदर खान यांच्यासह 51 रहिवाशांच्या सह्या आहेत.
निवेदन प्रधान मंत्री, मुख्यमंत्री व इतर प्रशासनाला पाठवले:
या निवेदनाच्या प्रती प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारत सरकार, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र, तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा पुढील तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.