बीड (वृत्तसंस्था) बीडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या एक तरुणाच्या बॅगमध्ये पोलिसांना उत्तेजित करणारे इंजेक्शन असल्याचा संशय आल्याने त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्या रक्त आणि लघवीचे नमूने तपासणीसाठी मुंबईच्या कालिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील पाऊल उचलणार आहेत.
रक्त, लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठविले !
शुक्रवारी (दि.२१) सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (२४) हा तरुण मैदानी चाचणीसाठी आला. असता त्याच्या बॅगमध्ये एक इंजेक्शन आणि औषधाची बॉटल आढळून आली. पोलिसांना हे औषध उत्तेजित द्रव्याचे असल्याचा संशय आहे. त्यामुळे सुनीलला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या रक्त आणि लघवीचे नमूने घेण्यात आले असून ते अन्न औषध प्रशासनामार्फत तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचे तपास अधिकारी विलास मोरे पाटील यांनी सांगितले आहे.
मैदानी चाचणीत येऊ दिला नाही अडथळा !
शिवाजीनगर पोलिसांनी सुनीलला संशय आल्याने ताब्यात घेतले असले तरी त्यासाठी आधी त्याची मैदानी चाचणी पूर्ण होऊ दिली. त्यानंतर त्याचे रक्त आणि लघवीचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो भरतीसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. तोपर्यंत त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून त्याच्याकडे सापडणारे औषध ही उत्तेजित करणारेच आहे, हेही समोर आलेले नाही. त्यामुळे सर्व गोष्टी आता अहवाल आल्यानंतरच कळतील, अशी माहिती तपास अधिकारी विलास मोरे पाटील यांनी दिली.