जळगाव (प्रतिनिधी) चोरी, गहाळ झालेले मोबाईल तसेच सोन्याचे दागिने, मोटारसायकल परत मिळाल्यानंतर आज अनेक तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. जळगावच्या मंगलम हॉलमध्ये आज (शुक्रवार) सकाळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला.
जळगाव पोलीस दलाने मागील काही महिन्यात धाडसी कारवाया करीत अनेक गुन्ह्यांचा उकल करीत आरोपींकडून मुद्देमालाची रीकव्हरी केली. त्यात गहाळ व चोरी झालेले ११५ मोबाईल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चैन स्नॅचिंगमध्ये गेलेली सोन्याचे चैन आदी मुद्देमालचा समावेश होता. आज सकाळी जळगावच्या मंगलम हॉलमध्ये सकाळी ११ वाजता जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. अनेक वर्षानंतर किंमती वस्तू परत मिळाल्यानंतर मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोबाईल चोरी, दुचाकी आणि मंगळसुत्र लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. वारंवार होत असलेले मोबाईल चोरीसह इतर गुन्ह्यातील संशयितांचा शोध लावण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई करत गुन्ह्यांचा उलगडा केला. यातून काही संशयितांना अटकदेखील करण्यात आली. यानंतर हा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यासाठी न्यायालयाची सर्व प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सर्व दागिने त्या मालकाला देण्यात आले. जळगाव पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन, पोलिसांप्रती विश्वास वाढीला मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया तक्रारदारांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.