चोपडा (प्रतिनिधी) समाज मंदिराच्या बाजूच्या जागेवर पत्रे लावल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत होऊन एकमेकांवर दगडफेक झाली. याप्रकरणी २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर सात जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११:३० वाजता चोपडा शहरातील पंचशील नगरात घडली.
पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेला समोरून पत्रे का लावले, कोणी लावले अशी विचारणा पंचशील नगर मधील चार ते पाच जणांनी बेग यांना केली. यात वाद वाढत जाऊन दोन्ही गटाकडून जमाव एकत्र होत एकमेकांना चापट बुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक केली. यात समाज मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची घटना दि. २ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पंचशील नगर जवळील सिमेंट रोडवर घडली.
घटनेवेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीस शिपाई हंसराज कोळी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोघं गटाच्या ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ संतोष पारधी हे करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी धाव घेतली.