जळगाव (प्रतिनिधी) क्रिकेट खेळण्यातून दोन गटात वाद झाला. त्यानंतर या वादाची ठिणगी तांबापुरात पडली. दोन गट आमने सामने दगड विटा फेकत आक्रमक झाले. यानंतर आरडाओरड होऊन गोंधळ उडाला. लहानमुले महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन पळापळ झाली. यात तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आले. पोलिसांनी तत्काळ धाव घेत हल्लेखोरांना पांगवित परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रविवार दि. ९ नोव्हेबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारात तांबापुरातील टिपू सुलतान चौक तसेच गवळी वाडा चौक येथे ही घटना घडली.
रविवार असल्याने परिसरातील मुले मेहरुण तलावाजवळ जे. के. पार्क याठिकाणी क्रिकेटचा सामना खेळत होते. याठिकाणी शाब्दिक वाद झाला. सामना संपल्यानंतर सर्व मुले घरी परतले. दुपारी तीन वाजता वादाची ठिणगी तांबापुरात पडली. त्यानंतर एकमेकांच्या दिशेने दगड भिरकविण्यात आले. घराच्या छतावर दगड पडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भीती पसरली. पळापळीत अनेकांनी घर गाठले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला.
तुफान दगडफेक, नागरिकांचा थरकाप
या भागात तुफान दगड, विटा भिरकत असल्याने भयभीत मुले, महिला घरात पळाले. दगडांचा मोठा आवाजाने नागरिकांचा थरकाप झाला. ठिकठिकाणी दगडांचा खच दिसुन आला. या प्रकाराने गोंधळ होऊन परिसरातील नागरिकांमध्ये पळापळ झाली. सर्वत्र भिती पसरली.
दगडांचा खच, दंगा नियंत्रक पथक दाखल
माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांसह दंगा नियंत्रक पथक, एलसीबी पथक तांबापुरात धावुन गेले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी धाव घेतली. ज्या परिसरात दगडविटांचा खच पडला होता. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, गणेश वाघ, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अशोक काळे तसेच पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी या भागात परिस्थिती प्रत्यक्ष जाणुन घेतली. परिसरात पोलीस तैनात परिसरात शांतता असुन व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
तांबापुरा भाग हिट लिस्टवर
गेल्या काही वर्षांपासुन तांबापुरा भागात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वाद, दंगल, दगडफेक होत असते. बऱ्याचदा या भागात या घटनांमुळे तणावाचे वातावरण होते. यामुळे तांबापुरा परिसर हिट लिस्टवर आहे.
















