लातूर (वृत्तसंस्था) ‘तूच आमच्या कुटुंबावर भानामती केल्याने माझी दोन्ही मुले गतिमंद झाली आहेत’, ‘तुला तर सोडतच नाही’, असे म्हणत मध्यरात्रीच्या सुमारास भानामती केल्याचा संशय असलेल्या दोघांच्या घरांवर तुफान दगडफेक केल्याची घटना चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे गुरुवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाच्या विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर तालुक्यातील बेलगाव येथील मधुकर ज्ञानोबा पस्तापुरे (वय ५५) यांना दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुले गतिमंद आहेत. यामुळे ती रात्री अपरात्री गावात फिरत असतात. याचा नागरिकांना त्रास होतो. ‘माझ्या मुलांना तुम्हीच करणी केलेली आहे’, असे म्हणत मधुकर पस्तापुरे याने गावातील नागनाथ धोंडीराम सूर्यवंशी आणि त्यांच्या शेजारील एका घरावर गुरुवारी (दि.९) मध्यरात्री तुफान दगडफेक केली. तसेच शिवीगाळ करून ‘तुला तर नंतर बघतो’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या संदर्भात सूर्यवंशी नागनाथ यांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मधुकर विरोधात शुक्रवारी पस्तापुरे यांच्या (दि.१०) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एन. एम. कल्याणे हे करीत आहेत.
















