नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र याच तयारीसंदर्भात पोलिसांनी जारी केलेलं एक पत्र सध्या फारच चर्चेत आहे. मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी या भागातील लोकांना खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका असे निर्देश दिले आहे.
लखनऊमध्ये मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी असलेल्या सरस्वती अपार्टमेंटला गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख केलाय. तसेच स्थानिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्यात. पण या सूचनांमध्ये एक सूचना कपडे वाळत घालण्याबद्दल आहे. कपडे बाहेर वाळत घालू नका, असं या पत्रात म्हटलंय.
पंतप्रधान गोमतीनगर पोलीस मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागामधील कार्यक्रमस्थळी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या भागामधील सर्व उंच इमारतील आणि टॉवर्सला सूचना केल्या जात आहेत. यामध्ये सरस्वती अपार्टमेंट थेट पोलीस मुख्यालयाच्या समोर असल्याने तुम्हालाही यासंदर्भात सूचना करण्यात येत आहे, असं पोलिसांनी इमारतीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
गोमतीनगर सेक्टर चारमधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाश्यांना सूचति करण्यात येत आहे की, १९ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बाल्कनी किंवा बाल्कनीच्या आजूबाजूला (खिडक्यांमध्ये) कुठेही कोणत्याही प्रकारची कपडे किंवा इतर गोष्टी लटकवू नका. तसेच या कालावधीमध्ये एखादी नवीन व्यक्ती तुमच्या इमारतीमध्ये वास्तव्यास आल्यास त्यासंदर्भातील माहिती तातडीने पोलीस स्थानकामध्ये कळवावी, असं पोलिसांनी या पत्रात म्हटलंय.