मुंबई (वृत्तसंस्था) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे. महिलांना रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी पैशांची मागणी, अडवणूक, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
तसेच राज्यातील रेशन कार्डमधील नाव कमी करणे व नवीन नावे जोडण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत निःशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली आहे. सरकारच्या वतीने राज्यातील मुली, महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महिलांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे. अर्जदार महिलेने रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.