धरणगाव (प्रतिनिधी) आगामी काळात साजरे होणारे सण उत्सवात विनापरवानगी व सुरक्षेची कुठलीही खबरदारी न घेता वाहनावर डीजे लावताना नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा सक्त ईशारा पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला आहे. ते पोलीस स्थानकात डीजे चालकांसोबत घेतलेल्या बैठकीत बोलत होते.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी आज धरणगाव शहरातील डीजे मालक व चालक यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पो.नि. देसले यांनी आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव लक्षात घेता डीजे मालक व चालकांना नियमांची माहिती देत ध्वनी प्रदूषण कायद्यासह नियमांचे व सूचनांचे उल्लंघन झाल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला. तसेच ध्वनी प्रदुषणामुळे शरीरास त्रास होतो. माणसांसह प्राण्यांवर परिणाम होतो. आवाजाची पातळी वाढली की, माणसांमध्ये ताणतणाव वाढण्यासह हदयाचे ठोके वाढतात. रक्तदाब वाढतो. त्यामुळे हदयाचे विकार जडण्याचा धोका असतो. तसेच माणसांच्या कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे बहिरेपणाही येण्याचा धोका असतो, असेही प्रबोधन पो.नि. देसले यांनी केले. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास ध्वनीप्रदुषण कायदयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.